अमळनेर- युवकांनी आपल्या मनात प्रबळ इच्छाशक्ती व संघर्षाची तयारी ठेवली तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश निश्चितपणे मिळेल असे प्रतिपादन जळगाव येथील दर्जी फाऊंडेशनचे संचालक प्रा. गोपाल दर्जी यांनी केले. ते येथील जी.एस.हायस्कूलमध्ये शिवशाही फाऊंडेशन व साने गुरुजी शैक्षणिक विचार मंचच्या वतीने आयोजित प्रेरणादायी व्याख्यानमालेत 'स्पर्धा परिक्षा व युवकांपुढील आव्हाने' या विषयावर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमळनेरचे नवनिर्वाचित आमदार अनिल भाईदास पाटील होते.प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, जि. प.सदस्या जयश्रीताई पाटील व ग.स.पतपेढीच्या संचालिका विद्यादेवी कदम यांची उपस्थिती होती.
प्रा.दर्जी पुढे म्हणाले, इच्छाशक्तीने काम केलं तर स्पर्धापरिक्षेच्या माध्यमातून अधिकारी होता येतं, त्यात कोणतीही परिस्थिती आड येत नाही. झापड लावलेल्या घोड्यासारखे धावले तर इच्छित स्थळी पोहचता येते.पालकांनी विशेषतः आईने मुलांशी शैक्षणिक संवाद साधला पाहिजे.मुलांना संघर्षात जगायला शिकवले पाहिजे.अधिकारी बनायचे असेल तर सुरक्षिततेचा परिघ ओलांडावा लागेल.स्पर्धापरीक्षा म्हणजे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून सर्वांगीण विकास करण्याचं माध्यम आहे.म्हणून त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे.धडपडणाऱ्या तरुणांना मदत करणं हे आपलं सामाजिक दायित्व असते.जीवनात महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक योगदान अवलंबिले पाहिजे.गणिताचा अभ्यास क्लुप्त्यांच्या माध्यमातून केल्यास फार सोपा आहे.कॉलेजची मुलं ही कलाकार असतात त्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे असेही मत प्रा. दर्जी यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी तालुक्यातील पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा वक्त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अध्यक्ष आमदार अनिल पाटील म्हणाले की,पालकांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार दिले पाहिजे.विद्यार्थ्यांनी प्रथम जीवनात आपले ध्येय ठरवले पाहिजे तरच यश संपादन करता येतं. स्पर्धेच्या युगात जगायचे असेल तर नियोजन करणे गरजेचे आहे.मा.आ.साहेबराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साने गुरुजी शैक्षणिक विचारमंचचे संस्थापक सदस्य दत्ता सोनवणे यांनी केले.वक्त्यांचा परिचय प्रेमराज पवार यांनी करून दिला.सूत्रसंचालन रवींद्र पाटील यांनी तर आभार प्रदर्शन अशोक पाटील यांनी केले.
यांचा झाला सत्कार
विद्यादेवी दामोदर पाटील, प्रकाश भिका पाटील, संजय भगवान पाटील, सतिलाल गंगाराम बोरसे, सुनिल नारायण मोरे, अर्चना मणिलाल बागुल, रणजित शिंदे,गायत्री साहेबराव देसले, भुषण सुरेश महाले, पांडुरंग विक्रम पाटील, आंबापिंप्री, अश्विन लिलाचंद पाटील यांच्यासह मारवड जि.प.मुलींची शाळा व जवखेडा जि.प.शाळा या दोन आदर्श शाळांचाही सत्कार करण्यात आला.
No comments
Post a Comment