अमळनेर - तालुक्यातील केंद्र प्रमुखांनी आपल्या केंद्रात शिक्षण परीषदा घेऊन यशस्वी कराव्यात व तालुक्यातील सर्व शाळा 'शाळा सिद्धी' मध्ये येण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन तालुका संपर्क प्रमुख व अधिव्याख्याता डॉ.राजेंद्र महाजन यांनी अमळनेर येथे केले. पंचायत समितीमध्ये झालेल्या गुणवत्ता कक्ष तालुका बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी आर. डी. महाजन हे होते.
याप्रसंगी व्यासपीठावर शालेय पोषण आहार अधिक्षक बी.पी.चौधरी, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पी. डी. धनगर , केंद्रप्रमूख संघटनेचे तालूका अध्यक्ष गोकूळ पाटील साने गुरूजी विदयालयाचे मुख्याध्यापक सतिष देशमूख यांची उपस्थिती होती.
डॉ राजेंद्र महाजन पुढे बोलतांना म्हणाले की, केंद्रप्रमूखांनी शिक्षण परिषदा यशस्वी होण्यासाठी वेळेचे योग्य व प्रभावी नियोजन करावे.
शाळा सिद्धिमध्ये तालूक्यातील सर्व शाळा 'अ' श्रेणीत आणण्यासाठी मुख्याध्यापक व उपशिक्षक यांनी भौतीक व शैक्षणिक विकास करून प्रयत्न करावा, सर्व शाळा अप्रगत विहीन करण्यासाठी नियोजन करावे, १०० % शाळा प्रगत करणे, शाळेतील सर्व विद्यार्थी व शाळा बोलक्या करणे,प्रशासकिय अधिकारी यांच्या शाळा भेटी प्रभावी ठरण्यासाठी नियोजन करावे,अधिकारी उत्कृष्ट मार्गदर्शक असावा, प्रादेशिक विदया प्राधिकरणाकडून इंग्रजी विषयाबाबत सुरु असलेले उपक्रमांचा नियमीत आढावा घेणे, अध्ययनस्तर निश्चितीनुसार नियोजन व अध्यापन याबाबत दक्षता घेणे, 'चला शाळा सुंदर करू या' व 'स्वच्छता पंधरवाडा' राबविणेबाबत उपक्रमांचे नियोजन करणे ( शाळेचे अंतरंग व बाह्यांग सुंदर करणे ),
भाषा , गणित , विज्ञान , इंग्रजी या विषयाच्या पेटया शासनाकडून मिळालेल्या आहेत त्यांच्यातील साहित्याचा अध्यापनात प्रभावी वापर होण्यासाठी समुपदेशन करावे, मागील शैक्षणिक वर्ष सन २०१८ - २०१९च्या कामावर आधारीत केंद्रनिहाय एका उत्तम शिक्षकाची विद्यार्थी संवादणूक पातळी , वर्गावर प्रभावी क्रिया , शिक्षक वर्तणूक इ . शैक्षणिक निकषांवर आधारीत निवड करावी,राष्ट्रीय संपादणूक व अध्ययन निष्पत्ती जनजागृती करणे, विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारी बाबत मार्गदर्शन, शिक्षक , पालक , शाळा व्यवस्थापन समिती , खाजगी औदयोगिक व सामाजिक संस्था समन्वयाने शैक्षणिक कामाचा उठाव करणे आदी सुचना डॉ.महाजन यांनी दिल्या.
त्यानंतर दत्तात्रय सोनवणे (मुख्याध्यापक पिंगळवाडे) एस. डी देशमूख (मुख्याध्यापक सानेगुरुजी), गोकूळ पाटील (केंद्रप्रमूख) यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विचार मांडले. गट शिक्षणाधिकारी आर. डी.महाजन यांनी अध्यक्षीय विचार मांडले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन तुषार बाविस्कर यांनी केले
No comments
Post a Comment