अमळनेर - भाजपा नेते उदय वाघ यांच्या अकस्मात झालेल्या दुःखद निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.भाजपासह सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक,शैक्षणिक,अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी उदय बापू वाघ यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या सोबत असणारा लढवय्या कार्यकर्ता अचानक आपल्यातून काळाने हिरावून नेला असल्याची भावना कार्यकर्ते व आप्तस्वकीय नातेवाइकांकडून व्यक्त केली जात आहे. डॉ.बहुगुणे हॉस्पिटल,ग्रामीण रूग्णालय,उदय वाघांचे अमळनेर व डांगर येथील निवासस्थान व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जमा झालेले शोकाकुल नागरिक आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून देत भावना व्यक्त करत होते. सामाजिक व राजकीय पटलावर सतत कार्यरत असलेला आपला मित्र,सखा, बंधू , सहकारी,मार्गदर्शक व नेता अचानक आपल्याला सोडून गेला याचा धक्का सर्वांना बसला होता.
मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन
तालुक्याचे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील,डॉ.बी.एस.पाटील,शिरीषचौधरी,नगराध्यक्षा पुष्पलता पाटील,आ.चंदूलाल पटेल,भाजपाचे किशोर काळकर, सुनिल बढे,पी.सी.पाटील,सुभाष पाटील,प्रभाकर पवार,अनुप अग्रवाल (धुळे),जि.प.चे.माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार, पाचोरा येथील अमोल शिंदे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, धुळे येथील उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड,अमळनेरचे उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, तहसिलदार मिलींद वाघ, चांदवडचे तहसिलदार प्रदीप पाटील, जि.प.कर्मचारी संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा सुर्वे आदींसह अमळनेर न.पा.चे नगरसेवक,विविध विभागातील अधिकारी सामाजिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले व वाघ परिवाराचे सांत्वन केले.
दि.२९ रोजी सकाळी अंत्यसंस्कार
दि.२९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता स्व. वाघ यांच्या मुळगावी डांगर बु.॥ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
No comments
Post a Comment