शासनाने काळी ज्वारी मका, हमी भावाने खरेदी करावी खासदार उन्मेश पाटील यांची मागणी जिल्हाधिकारी , पणन महासंघाकडे केली लेखी मागणी

Thursday, November 28, 2019

/ by Amalner Headlines

जळगाव -
गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टर वरील कापणीला आलेले ज्वारी आणि मका यासह सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या पिकांमध्ये सर्वाधिक क्षेत्र मका आणि ज्वारी पिकांचे असून ही पिके काळी पडलेली आहेत. शेतकऱ्यांकडून हाती आलेले धान्य मिळेल त्या भावाने विकले जाते आहे.बाजारात देखील ही काळी पडलेली ज्वारी व मका अतिशय मातीमोल भावाने खरेदी केली जात आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना गरजेपोटी पुन्हा नुकसान सोसावे लागत आहे. शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी शासनाने तातडीने हमी भावाने काळी ज्वारी व मका खरेदी करावी. यासाठी प्रत्येक तालुक्यात खरेदी केंद्र सुरू करावी अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी आज जिल्हाधिकारी आणि पणन महासंघाच्या अधिकाऱ्यांकडे  पत्राद्वारे केली आहे.


 ६२ हजार हेक्टर ज्वारी काळी.. 

जळगाव जिल्ह्यतील सर्व पिकांच्या पेऱ्यात ज्वारीचे सुमारे ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचे नुकसान झाल्याची शासकीय आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. कदाचित यापेक्षा देखील अधिक नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. जे थोडे फार उत्पन्न हाती आले आहे ते देखील काळे पडले आहे. गेल्या वर्षी चांगली ज्वारी पंचवीसशे ते अठ्ठावीसशे रूपये भावाने विकली गेली होती. आज मात्र शेतकऱ्यांच्या हाती असलेली ज्वारी पाणी लागल्याने काळी पडली ती बाजारात कमी दरात  खरेदी केली जात आहे. शेतकरी बांधव देखील शासनाकडून कुठलाही आशेचा किरण दिसत नसल्याने मिळेल त्या भावाने काळी पडलेली ज्वारी विकत आहेत. आधीच अतिवृष्टीचा फटका बसल्याने कंबरडे मोडले असताना दोंघी बाजूने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने हमी भावाने काळी पडलेली ज्वारी खरेदी करावी. यासाठी प्रत्येक तालुक्यात खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी शासनाकडे केली आहे.

 ७७ हजार हेक्टर मका पडला काळा. 

जिल्ह्यात कपाशी पिकाच्या खालोखाल सर्वाधिक नुकसान मका पिकाचे झाले असून लाखो क्विंटल मका अतिवृष्टी मुळे जास्तीत जास्त दिवस पाण्यात राहिला असल्याने अपेक्षित उत्पन्न हाती आलेले नाही. त्यामुळे जे पीक वाचले ते काळे पडले आहे. गेल्या वर्षी मका सुमारे अठराशे पेक्षा अधिक भावाने विकला गेला होता. मात्र त्या तुलनेत यंदा हा काळा पडलेला मका अतिशय कमी भावात विकावा लागत  असल्याने शेतकऱ्यांची पिळवणूक होत असून किमान हमी भावाने काळा मका खरेदी करावी. यासाठी तालुकास्तरावर लवकरात लवकर मका खरेदी करावी अशी अपेक्षा शेतकरी बांधवांनी खासदार उन्मेश पाटील यांच्या कडे केली आहे.

 शेतकरी बांधवांची आर्थिक लूट थांबावी 

गेल्या महिन्यातील अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे  मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून मी स्वतः जातीने लक्ष घालून जिल्हा कृषी अधीक्षक तसेच राज्याचे कृषी सचिव व केंद्राकडे पाठपुरावा करून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न केले. त्यातच हाती आलेले थोडे फार उत्पन्न देखील पाऊसाने काळे पडले आहे. त्यामुळे बाजारात अतिशय कमी भाव मिळत असल्याने शासनाने तातडीने हमी भावाने काळी ज्वारी व मका खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र करावी अशी लेखी मागणी केली आहे. शासनाने तातडीने दखल घ्यावी यासाठी माझे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत अशी भावना खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines