वाळू चोरांची मुजोरी वाढली, ट्रक व जेसीबी मशीन पळवले पोलिसात चोरी व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

Monday, November 18, 2019

/ by Amalner Headlines
अमळनेर -
तालुक्यात वाळू चोरटय़ांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जळोद येथील तापी नदी पात्रातून    अवैध पध्द्तीने वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक व जेसीबी मशीन मालकाने महसूल कर्मचाऱ्यांच्या तावडीतून वाहने पळवल्याचा धक्कादायक प्रकार घडला  आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसात चोरी व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     या बाबत अधिक माहिती अशी की,रविवारी १७ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जळोद येथील कोतवाल प्रवीण साहेबराव शिरसाठ यांनी तलाठी रवींद्र पाटील यांना फोनवरून जळोद येथून अवैध वाळू वाहतूक होत असल्याचे कळवल्यावरून तेथे धाड टाकली असता त्या ठिकाणी एक वाळूने भरलेला ट्रक क्रमांक एमएच- ०६ एसी- ४९० व बिना नंबरचे जेसीबी मशीन आढळून आले. सदर जेसीबी व ट्रक हे अमोल रमेश पाटील (रा. अमळगाव ) याच्या मालकीचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी कारवाई करीत असताना चालकाने अमोलच्या सांगण्यावरून जेसीबी मशीन पळवून नेले. ट्रकचा पंचनामा करून तहसील कार्यालयात जमा करायला सांगितले असता ट्रक नादुरुस्त असल्याचे अमोलने सांगून तलाठी रवींद्र पाटील हे अमोलला नोटीस द्यायला आले असता त्याने तेथून ७ हजार ७३० रुपये किमतीची वाळू भरलेला ट्रक पळवून नेला. म्हणून तलाठीच्या फिर्यादीवरून अमोल विरुद्ध भादवी ३७९ व ३५३ प्रमाणे चोरी व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास प्रभाकर पाटील करीत आहेत.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines