अमळनेर - शहरातील सर्वच प्रमुख मार्गावर खड्ड्यांचे मोठ्या प्रमाणावर साम्राज्य निर्माण झाले आहे. हे खड्डे बुजविणे व रस्ता दुरूस्तीकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत असून खड्डे म्हणजे अपघाताला आमंत्रण ठरू लागले आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे.
शहरातील खड्ड्याबाबत रोष व्यक्त करण्यासाठी काही युवकांनी रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करून गांधीगिरी केली व प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यात ललीत सातपुते,सुनिल साळी, हितेश होलार,पुष्कर नारखेडे,धनराज माळी या युवकांसह अनेक महाविद्यालयीन विद्यार्थीही सहभागी झाले होते. युवकांच्या या उपक्रमाकडे नागरिक उत्सुकतेने पहात होते.
रस्त्याच्या मधोमध खड्डा
धुळे रोड पलीकडील सुरभी कॉलनीजवळ अत्यंत रहदारीच्या रस्त्यावर खालील गटारीवरील स्लॅब तुटलेला असल्याने रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडलेला आहे. कॉलनी भागातून शहरात येणारा हा महत्वाचा रस्ता असल्याने त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची आवश्यकता आहे. पण याबाबीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.वाहने स्लिप होऊन अपघात घडण्याचे प्रकार नियमित घडत असल्याची चर्चाही नागरिकांत आहे.पथदिवे बंद असलेल्या भागात तर वाहन चालकाप्रमाणेच पायी चालणारे नागरिकांनाही जीव मुठीत घेऊन चालावे लागते.
राज्य मार्गाची स्थिती बिकट
त्याचप्रमाणे धुळे - चोपडा रोड,अमळनेर-बेटावद रस्त्याची अवस्थाही बिकट बनली आहे. या राज्य मार्गावर वाहतुकीचे प्रमाण मोठे आहे आणि त्यात गेले अनेक महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरू आहे. पैलाड ते सिंधी कॉलनी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. चोपडा-धुळे व बेटावद या मार्गावरही अपघात घडणे नित्याचे झाले आहे. जीवघेण्या अपघातामुळे मृत्यूमूखी पडण्याच्या घटना घडत आहेत. प्रशासनाने रस्तादुरूस्तीकडे तातडीने लक्ष घालावे अशी मागणी जनतेतून होत आहे.
No comments
Post a Comment