अमळनेर - येथील प्रताप तत्वज्ञान केंद्राच्या संरक्षण भिंती जवळून जाणा-या रस्त्यावर धोकादायक वळणामुळे अनेकदा लहान-मोठे अपघात घडण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहे. या मार्गावर वाहतुकीचे प्रमाण अधिक असल्याने मोठा व जीवघेणा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी या धोकादायक वळणावरील कंपाऊंडचा भाग काढल्यास अपघात टाळता येऊ शकतात त्यामुळे विद्यापीठाने भिंतीचा हा भाग काढावा या मागणीचे निवेदन परिसरातील नागरिकांनी आज सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली तत्वज्ञान केंद्राचे मानद संचालक प्राचार्य डॉ. एस.आर.चौधरी यांना दिले.
यावेळी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे कि,सदर रस्ता हा बंगाली फाईल,रामवाडी,अयोध्या नगर,केशवनगर,समता नगर, खाज्या नगर,तांबेपूरा भागामध्ये जाणारा मुख्य रस्ता असून येथे दररोज नागरिक लहान मोठया प्रमाणात अपघाताने जखमी होतात. येथून विप्रोचे अवजड वाहने,एस.टी.बसेस व रेल्वे मालवाहतूक ट्रक यांची मोठया प्रमाणात वर्दळ असते.तसेच येथून प्रताप हायस्कूल, प्रताप कॉलेज,मध्ये ये-जा करणारे शाळकरी मूले वावरत असतात. तसेच हा रस्त्या१३ ते १४ खेडयांकडे जाणारा मुख्य रस्ता आहे.तरी विद्यापीठाने कंपाऊंडच्या वळणावरील भाग काढावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर लोकनियुक्त नगराध्यक्षा जिजामाता कृषीभुषण सौ. पुष्पलता साहेबराव पाटील,या प्रभागाच्या नगरसेविका शितल राजेंद्र यादव, प्रताप कॉलेजच्या प्राचार्या ज्योती राणे, प्रताप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कोळी,व परिसरातील ६५ नागरिकांच्या सहया आहेत. निवेदन देण्यास आलेल्या नागरिकांशी प्राचार्य डॉ. एस.आर.चौधरी,सिनेट सदस्य दिनेश नाईक,प्रा.डी.डी.पाटील,हिंमत पाटील यांनी चर्चा केली. विद्यापीठाकडे सदर बाबतीत सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. यावेळी राजेंद्र यादव,प्रा. राजेंद्र बडगुजर,सुरेश शेजवळ,सुरेश कदम,गजानन चव्हाण,कालू पठाण,रेल्वे तिकीट निरीक्षक काशिनाथ पाटील, रेल्वे पार्सल ऑफिसर रविंद्र कविश्वर, सैनिक अतुल जाधव,दिपक चौधरी, प्रविण गव्हाणे,गोटू महाजन आदी उपस्थित होते.
No comments
Post a Comment