एस.टी.च्या ‘स्मार्टकार्ड’ योजनेसाठी १ एप्रिल २०२० पर्यंत मुदतवाढ

Saturday, December 28, 2019

/ by Amalner Headlines
मुंबई-
महाराष्ट्र राज्य परिवहन (एस टी) महामंडळाच्यावतीने विविध सामाजिक घटकांना एस. टी. प्रवास भाडे सवलतीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘स्मार्टकार्ड’ योजनेला १ एप्रिल  २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय़ महामंडळाने घेतला आहे. यासंदर्भात नागपूर अधिवेशना दरम्यान विविध लोकप्रतिनिधी व ज्येष्ठ नागरिकांनी परिवहनमंत्री ना.सुभाष देसाई यांची भेट घेऊन मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. 
    राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने विविध घटकांसाठी १ जून २०१९ पासून स्मार्टकार्ड योजना सुरू करण्यात आली असून सद्यस्थितीत ३० लाख ९७ हजार ७२६ जणांची नोंद झाली आहे. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कारार्थी, विद्यार्थी तसेच व्याधीग्रस्त रुग्णांना ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत स्मार्टकार्ड मिळविणे आवश्यक होते.  नोंदणीला मिळालेला प्रतिसाद पाहता ही मुदत वाढवून देण्याची मागणी लोकप्रतिनिधी,ज्येष्ठ नागरिकांनी केली होती. त्यास परिवहन मंत्री ना. देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.ज्येष्ठ नागरिक, विविध पुरस्कारार्थी,अधिस्विकृतीधारक पत्रकार तसेच व्याधीग्रस्त रुग्ण यांना स्मार्टकार्ड ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत प्राप्त करणे आवश्यक होते. परंतु आता ही मुदत ३१ मार्च २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे व १ एप्रिल २०२० पासून स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे.
मासिक,त्रैमासिक पासधारकांना स्मार्टकार्ड १५ फेब्रुवारी २०२० पासून बंधनकारक करण्यात येणार आहे.तसेच विद्यार्थ्यांसाठी १ जुन २०२० पासून स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात येत आहे.
दिव्यांगांसाठी अद्याप स्मार्टकार्ड योजना लागु करण्यात आली नाही. त्यामुळे दिव्यांगांसाठी सद्याचीच कार्यपद्ध्‍ती लागु राहील. या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.सर्व घटकांनी विहित कालावधीत स्मार्टकार्ड प्राप्त करुन घ्यावे असे संबंधित विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे. 

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines