------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोना आजार अमळनेरसह जिल्ह्यात कहर वाढवत आहे. या आजाराच्या प्रादुर्भावामुळे अनेक जणांचे बळी गेले आहेत. अमळनेर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शहरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने तोंडी आदेश देऊन कोरोना सर्व्हेचे काम दिले आहे. या कर्मचा-यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाच्या केवळ तोंडी आदेशाने अंगणवाडी कर्मचारी गेल्या ३ महिन्यापासून जिवाची पर्वा न करता शहरात घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य विषयक माहिती संकलित करून दररोज न.पा.आरोग्य विभागास देत आहेत.दि.१७ जुन रोजी अलका चौधरी अंगणवाडी मदतनिस ह्या कोरोनाचे नियमित काम करण्यासाठी रूबजी नगर येथे गेल्या असता तेथील रहिवाशांनी त्यांना घेराव घालून काम करण्यास विरोध करत धमकावले आणि तेथून हाकलून लावले.त्यामुळे श्रीमती चौधरी ह्या घाबरलेल्या स्थितीत आहेत. या घडलेल्या प्रकाराबद्दल त्यांनी त्याच दिवशी न.पा.वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली. परंतु सदर तक्रारीची आजतागायत कोणीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे कोरोनाचे काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काम करत असताना या महिला कर्मचाऱ्यांबाबत काही विपरीत घटना घडल्यास त्याची हमी कोण देणार ? यांची जबाबदारी आजतरी प्रांताधिकारी,बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, न.पा.आरोग्य विभाग घ्यायला तयार नाही.त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासन घेत नसेल तर अंगणवाडी कर्मचारी कोणत्याही क्षणी कोरोनाचे काम बंद करतील. असा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी दिला आहे.
No comments
Post a Comment