अमळनेर - कोरोना महामारीत अमळनेरच्या वैद्यकीय सेवा अत्याधुनिक केल्यामुळे युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे आमदार पाटील व जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांचा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आला.
कोव्हिड जागतिक महामारीत समस्यांचा प्रचंड व्याप असतांना त्या समस्या सोडवण्यासाठी व समस्या निर्माण होऊ नयेत तसेच आरोग्य सेवा सुरळीत व्हावी म्हणून आमदार अनिल पाटील यांनी स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन जळगाव जिल्ह्यात तालुकास्तरावर पहिले कोरोना केअर सेंटर उभे केले. तसेच स्वतंत्र कोव्हिड रुग्णालय उभारून जिल्ह्यात रुग्णांचा भार कमी केला. स्वतंत्र खासगी व शासकीय डॉक्टरांच्या सहकार्याने व महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना आरोग्य सेवेचा सातत्याने आढावा दिला व उपायोजना संबंधात बैठका घेऊन व्यवस्थित नियोजन केले. त्यामुळे आता शहरातच अँटिजेन चाचणी होत असल्याने कोरोना आजाराचे तात्काळ निदान याठिकाणी केले जात असून केंद्र सरकारने अँटिजेन सेंटर म्हणून मान्यता दिली आहे.
यापूर्वी केंद्रीय समितीने कोरोना केअर सेंटर व कोरोना कोव्हिड रुग्णालय याबाबत समाधान व्यक्त केले. रुग्ण व्यक्तींना धीर दिला तर पॉझिटिव्ह रुग्णांना आधार देत त्यांचे वैयक्तिक प्रश्न व वैयक्तिक समस्या सांगण्याचा विश्वास निर्माण करून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यात आरोग्य सेवेचा आदर्श उभा केला. बऱ्या झालेल्या रुग्णांना कोरोना मुक्त प्रमाणपत्र देऊन जगण्याचे बळ वाढवले.
वटसावित्री पौर्णिमेला कोरोना केअर सेंटरमध्ये भोजनाची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतः जेवण केले. मी तुमच्यासोबत आहे हे दाखवून दिले. परस्पर संबंध जोपासण्याचे कौशल्य त्यांनी दाखवत एक आमदार म्हणून अनिल भाईदास पाटील यशस्वी व परिणामकारक ठरले आहेत.

शहरातील सर्व डॉक्टर्सचे कोरोना काळात दरवाजे बंद झाले असतांना नागरिकांना लहान मोठ्या आजारासाठी वैयक्तिक आरोग्य सेवा उपलब्ध होत नव्हती. ही अडचण लक्षात घेऊन सात दिवस वैयक्तिक शिबिर आयोजित केले. तब्बल १ हजार रुग्णांची तपासणी केली व मोफत सेवा उपलब्ध करून दिली. हा विचार व निस्वार्थ काम करण्याची तळमळ या गुणांमुळे आनंदाने जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले. माणूस हीच संपत्ती आहे वायफळ खर्च नासाडी टाळावी हा दृष्टीकोन महत्वाचा ठेवत ते उंचीवर गेले. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राची माहिती घेतली. येथील अपूर्ण बाबींसाठी तसेच आरोग्य केंद्र सुसज्ज व अद्ययावत करण्यासाठी स्थानिक आमदार निधीतून ५० लाखांचा निधी दिला. मतदारसंघातील विविध घटकांच्या अडचणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विविध मंत्री यांच्यासमोर मांडल्या. नेहमी जिल्हाधिकारी जळगाव यांच्या संपर्कात राहून प्रशासकीय पातळीवरील अडचणीवर मात केली, पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, डॉक्टर्स, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, अधिकारी, शिक्षक व स्वयंसेवी संघटनेचे कार्यकर्ते,जागृत नागरिक अथक प्रयत्न करत आहेत. हेच खरे कोरोना योद्धे आहेत. त्यांना देखील आम्ही सॅल्युट करतो अशी भावना युवा कल्याण प्रतिष्ठानचे प्रा.अशोक पवार, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, चेतन शहा, संदीप जैन यांनी व्यक्त केली.
भानुबेन बाबुलाल गोशाळा अमळनेर यांच्या पुढाकाराने या मोफत अन्नछत्र या कार्यक्रमात आ.पाटील सुरुवातीपासून होते. या संदर्भात प्रशासनासोबत अनेक बैठका झाल्या. अन्नछत्राचे उद्घाटन केले, अन्नछत्र चालू राहावे यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत व सहकार्य केले ते सतत ४५ दिवस साडे सात हजार लोकांना अन्नदान करता आले. विशेष म्हणजे आमदार पाटील यांनी लग्नाचा वाढदिवस गरजूंना अन्नदान करून साजरा केला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची गोशाळेतल्या उपक्रमासाठी गोशाळेला भेट घडवून आणली. लॉकडाऊनच्या त्या काळातही उपक्रम यशस्वी झाला पाहिजे यासाठी पूर्णपणे झोकून देऊन काम केले. स्वतःचा पी.ए, बॉडीगार्ड पॉझिटिव्ह असतांना कोरोना त्यांच्या अंगाला शिवला नाही ही त्यांनी बजावलेल्या सेवेची बाजू हे विशेष. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर व प्रेम निर्माण झाले आहे.
तालुक्यातील ब्राह्मणे या छोट्याशा गावात त्यांनी कोरोना पार्श्वभूमीवर केलेल्या वरील कार्यामुळे त्यांचे गावकऱ्यांनी औक्षण करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यांनी स्वतः अनेकांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई पाटील यांनी वैयक्तिक स्वरूपात जनतेला सतत मदत व सहकार्य सुरू ठेवले आहे. यामुळेच आमदार अनिल पाटील व जयश्री पाटील या दांपत्याला युवा कल्याण प्रतिष्ठान यांच्यामार्फत शनिवारी सन्मान पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
No comments
Post a Comment