-----------------------------------------------------------------------
अमळनेर - जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधीतांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने दि.७ ते १३ जुलैपर्यंत जिल्ह्यातील जळगाव महापालिका क्षेत्र, भुसावळ,अमळनेर पालिका क्षेत्रात लॉकडाऊन करण्याचा निर्णय आज घेतला आहे. दि.७ जुलैच्या पहाटे पाच वाजेपासून ते दि.१३ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत वरील क्षेत्रात लॉकडाउनचे आदेश काढण्यात आले आहेत. वाढती रूग्ण संख्या चिंताजनक
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिवसेंदिवस अधिक तिव्रतेने पसरत आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्ण संख्या ४००० वर पोहचली आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून पुर्णतः लॉकडाउन करणे अत्यावश्यक झाल्याने आदेश काढण्यात आले आहेत.
काय आहेत निर्देश
प्रशासनाने जारी केलेल्या निर्देशानुसार लॉकडाऊनच्या ठरलेल्या कालावधीत नागरीकांना आपल्या रहिवासाच्या परिसरापासून फक्त दोन कि.मी. अंतरातच औषधी, दुध खरेदी करण्यासाठी जाण्यास परवानगी असेल. नागरीकांना दुचाकी, तिनचाकी, चारचाकी वाहने वापरण्यास देखील बंदी असेल.एमआयडीसीतील कंपन्यांसाठी होणारी वाहतुक केवळ सुरू राहणार आहे. जळगाव, भुसावळ व अमळनेर शहर वगळता ग्रामीण भागात व इतर पालिका क्षेत्रात सर्व व्यवहार सुरू राहणार राहतील.
घ्यावी लागणार परवानगी
जळगाव,भुसावळ,अमळनेर येथील बाजार समितीत केवळ घाऊक व ठोक विक्रीचे व्यवहार सुरू राहतील. किरकोळ खरेदी विक्री करणाऱ्यांना बाजार समितीत परवानगी असणार नाही. रूग्णांना डॉक्टरांची गरज असेल तरच वास्तव्यास असलेल्या प्रभागाच्या बाहेर जाता येणार आहे. शेतीच्या कामांसाठी बि- बियाणे, किटकनाशके खरेदी करणे यासाठी संबंधीत क्षेत्राबाहेर जाता येईल. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना शेतीचा सात-बारा उतारा जवळ बाळगावा लागणार आहे. लॉकडाउन लावण्यात आलेल्या क्षेत्रातील पेट्रोल पंप चालकांना फक्त अत्यावश्यक सेवांच्या व्यक्तींना पेट्रोल,डिझेल विक्रीची परवानगी आहे.
हे असेल बंद
लॉकडाउनच्या कालावधीत किराणा दुकान, लिकर शॉप, सलुन दुकाने, खासगी कार्यालय, कुरिअर,इलेक्ट्रिशियन,प्लंबर, गॅरेज/वर्कशॉप आदी दुकाने उद्याने बंद राहतील.
हे असेल सुरू
मेडिकल स्टोअर्स, हॉटेल/रेस्ट्रॉरंट (पार्सल सुविधा), ओपीडी,दुध खरेदी विक्री केंद्र, कृषी संबंधीत कामे, कृषी केंद्र, शासकिय कार्यालय, बॅंका या निर्धारित वेळेत सुरू राहतील.
कडकडीत बंद पाळण्याचे प्रशासनाचे आवाहन
अमळनेर,जळगाव व भुसावळ या ठिकाणी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून नागरिक शासकीय निर्देशांचे गांभीर्याने पालन करीत नसल्याचे दिसून येत आहे. ही रूग्ण संख्या रोखण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे व दि.७ ते १३ जुलैपर्यंत कडकडीत बंद पाळावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.
No comments
Post a Comment