---------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोनाच्या लॉक डाऊनमुळे वाहतुकीवर काही निर्बंध असल्याचा फायदा घेत तालुक्यातील चोपडाई येथील जिल्हाच्या सीमेवरील चेकपोस्टवर पोलिस वाहनधारकांडून गैरप्रकारे पैसे उकळत असल्याचा प्रकार रोजच घडत असून याठिकाणी अनेकांची लूट होत असल्याची माहिती आ. अनिल पाटील यांना मिळताच त्यांनी तात्काळ त्याठिकाणी धाव घेऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. काही कर्मचा-यांच्या या कृतीमुळे पोलीसांबद्दल नाराजीचा सुर उमटत आहे. विशेष म्हणजे रात्री हा प्रकार आमदारांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ गाडी काढून चोपडाईच्या दिशेने धाव घेतली. मात्र पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत चेकपोस्ट वरील कर्मचाऱ्याना तात्काळ बोलावून आमदारांना जानव्याजवळ गाठले,तेथेच सर्वांसमक्ष आ.पाटील यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढून लॉकडाऊनच्या नावाखाली माझ्या जनतेची अशी कुणी अडवणूक व लूट करीत असेल तर ती मुळीच सहन केली जाणार नाही अशी तंबी देत पोलीस निरीक्षकांकडेही नाराजी व्यक्त केली आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय विभागीय चौकशी करून दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली.दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून आ. अनिल पाटील यांच्याकडे चोपडाई कोंढावळ येथील सीमाबंदी चेकपोस्टवर पोलिसांकडून लूट होत असल्याची तक्रार अनेक नागरिक व वाहनधारकांनी केली होती. यानंतर काल रात्री टाकरखेडा येथील एक कुटुंब धुळे येथून अत्यावश्यक काम आटोपून वाहनाने येत असतांना चोपडाई येथे त्यांना अडवून बराच वेळ ताटकळत ठेवले आणि एक पंटर मार्फत सोडण्याचे पैसे घेतले. संबंधितांनी ही बाब आ.अनिल पाटील यांना फोन करून सांगितली व तक्रार केली.
आमदारांनी त्या पोलिसास मोबाईल देण्याचे सांगितले असता संबंधित पोलिसाने नकार दिला यामुळे आमदारांनी संतप्त होत आपले वाहन काढून चोपडाईचा रस्ता धरला तोपर्यंत पोलीस निरीक्षक मोरेंना ही माहिती मिळाली असल्याने त्यांनीही आमदारांच्या मागे जाऊन त्यांना जानव्याजवळ गाठत समजूत काढली. पोलीस कर्मचा-यांना त्याठिकाणी बोलविल्यानंतर आमदारांनी कडक शब्दात झापले. आमदारांनी नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही केल्याने जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे. कोरोना आजारामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात पोलीस दलाने अतिशय प्रभावी काम केल्याने नागरिक पोलीसांना धन्यवाद देत होते. पण रस्त्यावर वाहने अडवून किरकोळ कारणाने त्रास देणे व पैसे उकळणे यासारख्या प्रकारामुळे नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.
चोपडाई चेकपोस्ट लुटीचा अड्डा - आमदारांचा आरोप
यासंदर्भात आ.अनिल पाटील बोलताना म्हणाले की, शासनाने लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता आणल्यानंतर तालुका अंतर्गत प्रवास सुरू झाला आहे. मात्र काही पोलीस कर्मचारी नाकाबंदीच्या नावाने विनाकारण लोकांची अडवणूक करतात.
चोपडाई कोंढावळ येथील चेक पोस्टवर दोन ते तीन तास काही वाहनांना थांबवून ठेवले जाते आणि पंटर मार्फत पैसे घेऊन सोडले जाते.अनेक जण धुळे येथे डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट घेऊन जात असतात विशेष म्हणजे वाहनात संबंधित रुग्ण आणि फाईल सर्व असते परंतु तरीही त्यांना पासेसच्या नावाने विनाकारण अडवून पैसे उकळले जातात. कुणी व्यावसायिक अंडे आणत असेल तर त्यांचे ट्रे उतरऊन ठेवले जातात,कुणाचा किराणा माल अथवा इतर साहित्य असेल तर त्याचीही लूट केली जाते,असे अनेक किस्से याठिकाणी घडत असून एकीकडे कोरोना लॉकडाऊनमुळे जनता त्रस्त असताना अश्या पद्धतीने पोलिसांनी पिळवणूक करणे अयोग्य आहे,यामुळे याची गंभीर दखल मी घेतली असून वरिष्ठांशी देखील याबाबत बोलून तक्रार केली आहे,यामुळे याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी आपण केली असल्याचे आ.अनिल पाटील यांनी सांगितले.
No comments
Post a Comment