----------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्थायिक पातळीवर दर सोमवारी जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज दि.२६ जुलै रोजी अमळनेर शहरात जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे. तर इतर दिवशी व्यापारी व इतर आस्थापनांना सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण काही व्यापारी बांधवांनी दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ व्यवहारासाठी योग्य असल्याचे मत व्यक्त केले असून प्रशासनाने याबाबत पुनर्विचार करावा अशी मागणी व्यापारी बांधवांकडून समोर आली आहे.
आज जनता कर्फ्यु
अमळनेरच्या प्रांताधिकारी सीमा अहिरे यांचे दालनात व्यापारी संघटना प्रतिनिधी व प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत दर सोमवारी जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज दि.२७ जुलै रोजी जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे. अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. मेडिकल्स् , रूग्णालय,कृषी विषयक सेवा पुरविणारी दुकाने,दुध विक्री या अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. पण कृषी केंद्र चालकांच्या संघटनेने आपली दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यु मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज कृषी केंद्र बंद रहातील याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. व्यापारी बांधवांनी शासन निर्देश पाळण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नपाच्या मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड व उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी केले आहे.
दररोज व्यवहारासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ ही वेळ योग्य - व्यापा-यांची मागणी
याबाबतही काही व्यापारी बांधवांनी वेगळे मत व्यक्त केले आहे. लॉकडाऊन कालावधी पूर्ण झाल्यानंतर सुरूवातीला सकाळी ९ ते दुपारी ३ असा कालावधी दुकाने उघडण्यासाठी दिला होता. त्यात नंतर वाढ करून तो सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आला होता. दि. ७ ते १३ जुलै दरम्यान झालेल्या लॉकडाऊन नंतर आता दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. ही वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंतच राहीली असती तरी चालले असते असे मत व्यापारी बांधवांनी व्यक्त केले आहे. बॅंकेचे व्यवहार दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू असतात. तर शहरी व ग्रामीण भागातील ग्राहक दुपारीच खरेदी आटोपून घेत असल्याने सायंकाळी ग्राहकांची फारशी वर्दळ बाजारपेठेत नसते अशी सध्याची स्थिती आहे. केवळ फिरणारे या वेळेचा फायदा घेऊन गावात फिरत असतात तरी दुकाने सुरू ठेवण्याबाबतच्या निर्णयाचा प्रशासनाने पुनर्विचार करावा व त्यानंतरचा कालावधी व्यापारी बांधवांना दुकानात मालाची ने - आण करण्यासाठी वापरता येऊ शकतो त्यादृष्टीने विचार करावा अशी मागणीही व्यापारी बांधवांनी प्रशासनाकडे केली असल्याचे समजते. आता याबाबतचा निर्णय प्रशासनावर अवलंबून आहे.
No comments
Post a Comment