अमळनेर - येथील कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेल्या बापू निंबा वाणी या रुग्णाच्या अपघाती मृत्युची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लाडशाखीय वाणी समाजातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बापू निंबा वाणी हे वृद्ध आपल्या परिवारासह अमळनेर येथे वास्तव्यास होते. त्यांच्या परिवारातील काही जण कोरोना बाधीत झाले. त्यांना कोविड सेंटरला कॉरेन्टाईन केले व त्यांचा स्वॅब निगेटीव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. नंतर त्यांच्या संपर्कात आलेले बापू वाणी हे मजुरी काम करीत असल्याने त्यांचा स्वॅब घेतला नव्हता. परंतु कोविड सेंटर मधुन
वारंवार त्यांच्या स्वॅब बाबत विचारणा होऊ लागल्याने दिनांक ९ जुलै रोजी त्यांचा पुतण्या मंगेश यांने त्यांना दाखल करून त्यांची नोंद केली. त्यानुसार बापू वाणी यांना कोविड सेंटर मधील रूम नं.६८ मध्ये थांबण्यास सांगितले. मात्र २ दिवसानंतर म्हणजे दि.११ जुलै रोजी मंगेश हे सेंटरला गेल्यानंतर काकांची चौकशी केली असता, ते सेंटरला नाही असे सांगण्यात आले. शेवटी त्यांचा मृत्युदेह पारोळा तालुक्यातील विचखेडा येथील रस्त्यावर अपघातात बेवारस प्रेत म्हणून सापडले. या घटनेस प्रशासन जबाबदार असून या संदर्भात योग्य ती चौकशी व्हावी व मयत बापू वाणी व त्यांच्या परिवारास योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी लाडशाखीय वाणी समाजातर्फे स्वाती राजेश कोठावदे, पंकज काशिनाथ मराठे, योगेश दत्तात्रय येवले, जितेंद्र हरी राणे, महेश पांडूरंग कोठावदे, सुनिल पांडूरंग वाणी, विनोद प्रभाकर कोठावदे, सुनिल चंद्रकांत भामरे यांनी केली आहे. दरम्यान, निवेदनाच्या प्रति माजी आमदार स्मिता उदय वाघ आणि खासदार उन्मेष पाटील यांनाही देण्यात आल्या आहेत.
No comments
Post a Comment