जळगाव – जळगाव जिल्हा वासियांनी स्वयंशिस्तीचे पालन करत एकजुटीने, एकदिलाने कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडून त्यावर मात करायची आहे. त्यासाठी सर्वांनी ‘शासनाचे दूत’ म्हणून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज जळगावकरांना केले.
फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून श्री.राऊत यांनी आज नागरिकांशी मनमोकळेपणाने संवाद साधला. जिल्हावासियांचा मोठ्याप्रमाणात प्रतिसाद या फेसबुक लाईव्ह संवादास मिळाला. संवादाच्या सुरूवातीस श्री. राऊत यांनी जळगावातील कोविड योद्धे प्रयत्नांची पराकाष्ठा करीत या युद्धात रात्रंदिवस काम करत आहेत. या यंत्रणांचे मनोबल उंचावणे आपणा सर्वांसाठीच महत्त्वाचे आहे. प्रशासनातील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी पूर्ण क्षमतेने कार्य करत आहे. परंतु काम करताना होणाऱ्या चुका प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचे कार्यही नागरिकांनी करावे, त्याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. नागरिकांनी प्रशासनासोबत येऊन प्रशासनास सहकार्य करावे, चुका असतील त्या कळवाव्यात, नागरिकांच्या सूचनांची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करण्यात येईल असेही श्री. राऊत म्हणाले.
मीच माझा रक्षक’ म्हणून काम करावे
लॉकडाऊन,कर्फ्यूने परिस्थिती नियंत्रणात येईलही, परंतु नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळत मास्कचा वापर करणे, वारंवार हात साबणाने धुणे, शारीरिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा वापर करावा. तसेच स्वयंशिस्तीने सामाजिक जीवनात आपली जबाबदारी ओळखून समाजात जनजागृती तर करावीच, याचबरोबर ‘मीच माझा रक्षक’ माणून आपली स्वत:ची व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावे, असे आवाहनही श्री. राऊत यांनी नागरिकांना केले.
No comments
Post a Comment