पोलीसांनी लावला तपास - गुटख्यावर पडला प्रकाश कुरकु-याच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक प्रकरणी ट्रक व नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त - धरणगावात गुन्हा दाखल ट्रक चालकास दोन दिवसाची पोलीस कोठडी - एका संशयिताचा शोध सुरूच

Wednesday, July 29, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर -
कुरकुरे वाहतूक करणारा ट्रक धरणगाव येथे दि. २८ जुलै रोजी पोलीसांनी अडविला आणि तपासात कुरकुरे वाहतुकीच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व धरणगाव पोलीसांनी संयुक्तपणे कारवाई केली. यात ट्रक व नऊ लाखाचा गुटखा असा  सुमारे १९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ट्रक चालकास अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर एका संशयिताचा शोध सुरू आहे. 
पोलीसांना आधीच मिळाली होती माहिती
       धरणगावमार्गे गुटख्याचा ट्रक जाणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी दि.२८ जुलै रोजी धरणगाव येथे रेल्वे उड्डाणपूलाजवळ एक ट्रक क्र. एम.एच.०३, सी.पी.१९४३ हा  चौकशीसाठी अडवला असता त्यात वरील बाजूस कुरकुरे गोणी व आतील बाजूस विमल व गोवा कंपनीचा गुटखा गोणी ठेऊन वाहतूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. ट्रक चालक मेहराज रहमुल्ला अहमद (वय ३८) याच्याकडे चौकशी केली असता सदर माल अमळनेर येथील व्यापारी प्रकाश वासवानी यांचा असल्याचे त्याने सांगितले.
पोलीस तपासात उघडकीस आले गुटख्याचे अमळनेर कनेक्शन
         कुरकु-याच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पोलीसांनी केलेल्या चौकशीत गुटखा व्यापा-यावर "प्रकाश" पडला आणि गुटख्याचे अमळनेर कनेक्शन उघडकीस आले आहे. सदर गुटखा व्यापा-याच्या चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याच दिवशी अमळनेर येथे येऊन गेल्याची चर्चा असून या प्रकरणातील दुसरा संशयित असलेला गुटखा व्यापारी प्रकाश वासवानी हा पसार होण्यात यशस्वी झाला.
या पथकाने केली कारवाई
        स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे, सपोनि नारायण पाटील, अशोक महाजन,रामचंद्र बोरसे, रविंद्र घुगे,मनोज दुसाने,रामकृष्ण पाटील,प्रविण हिवराळे,दिपक शिंदे,परेश महाजन,महेश पाटील, दादाभाऊ पाटील यांच्या पथकाने धरणगाव पोलीसांसह आकस्मिक कारवाई केली आहे. यात ८ लाख ९३ हजार २८० रूपयांचा माल व अंदाजे १० लाख रूपयांचा ट्रक असा सुमारे १९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पो.हे.कॉ.मनोज दुसाने यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सपोनि पवन देसले हे पुढील तपास करीत आहेत. आज ट्रक चालकास न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या घटनेतील फरार संशयित आरोपी प्रकाश वासवानी याचा शोध सुरू असल्याचे समजते.
गुटख्यावर बंदी आणि व्यापा-यांची सुवर्णसंधी
      गुटखा व्यापारावर बंदी असतांनाही कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन मध्येही सर्वत्र गुटखा बाजार तेजीत होता. त्या दरम्यानच्या काळात गुटखा प्रकरणी अनेक कारवाया पोलीसांनी केल्या आहेत. मात्र तरीही अव्वाच्या सव्वा भावात गुटखा विक्री या व्यापा-यानी करून एक प्रकारे प्रशासनाला आव्हान दिले होते. धरणगाव येथील घटनेमुळे गुटखा व्यापा-यांमध्ये खळबळ उडाली आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines