पाडळसरे धरणाच्या तांत्रिक अडचणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दूर केल्या आहेत. याबाबत आज मुंबई येथे जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. पाडळसरे धरणाच्या संकल्प चित्रास मान्यता दिल्याबद्दल जलसंपदा मंत्र्यांचे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत आमदार अनिल पाटील यांनी आभार व्यक्त केले आहेत.

बैठकीस यांची होती उपस्थिती
या बैठकीस राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार श्रीमती लता सोनवणे, सचिव-जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास,संचालक-तापी पाटबंधारे विकास महामंडळ, कांबळे, जलसंपदाचे कार्यकारी मुख्य अभियंता मोरे, अधीक्षक अभियंता सार्वजनिक अभियंता प्रशांत सोनवणे, नदीजोड प्रकल्पाचे समन्वयक व्हि.डी.पाटील,अधीक्षक अभियंता, लोअर तापी जलसंपदा विभाग देशमुख यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत सकारात्मक निर्णय
जळगाव जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रकल्पाबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सोबत मुंबई येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या दालनात दुपारी एक वाजता बैठक संपन्न झाली. त्यात पाडळसरे धरण संकल्पचित्र मान्यता व तापी नदीवरील भोकर पुल यासह उपेक्षित प्रलंबित योजनांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी धरणाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित संकल्पचित्राला मान्यता दिली व ती मान्यता प्रत लगेच तापी खोरे महामंडळाकडे रवाना करण्यात आली. यासह पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री सिंचाई योजनेत समावेश करावा अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी केली. त्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यातील ९० प्रकल्पांसाठी ३२ हजार कोटी रुपये वित्तीय संस्थांकडून घेतले जात असून त्यात पाडळसरे धरणाचा समावेश प्राधान्याने केला जाईल असे आश्वासन दिले. यासह प्रधानमंत्री सिंचन योजनेत देखील समावेश करण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
No comments
Post a Comment