अमळनेरात आज साप्ताहिक जनता कर्फ्यु - रुग्णांची वाढती संख्या धक्कादायक व्यवहारासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ हीच वेळ ठेवा - व्यापा-यांचा सूर - प्रशासन लक्ष देणार का ?

Sunday, August 9, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर -
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्थानिक पातळीवर दर सोमवारी जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज दि.१० ऑगस्ट रोजी अमळनेर शहरात जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे. तर इतर दिवशी व्यापारी व इतर आस्थापनांना सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर काही व्यापारी बांधवांनी दररोज व्यवसायासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ कोरोनाच्या सध्याच्या परिस्थितीत   योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.  प्रशासनाने या विषयात लक्ष देऊन पुनर्विचार करावा अशी मागणी पुन्हा व्यापारी बांधवांकडून समोर आली आहे.  
रूग्ण संख्येत वाढ धक्कादायक
          अमळनेर तालुक्यात जून - जुलै महिन्यात रूग्ण संख्या कमी झाली होती. जनता कर्फ्यु व नियमांचे कठोर पालन यामुळे आपण कोरोनावर विजय मिळवला आहे अशी भावना निर्माण झाली होती.पण ऑगस्ट महिन्यात दररोज वाढत असलेली रूग्ण संख्या धक्कादायक असून तालुक्यातील ग्रामीण भागातून रूग्ण आढळून आल्याने अधिक  काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे आज दि.१० ऑगस्ट रोजीचा जनता कर्फ्यु जनतेने यशस्वी करावा.नेहमीप्रमाणे 
अत्यावश्यक सेवा वगळता कोणतेही दुकान सुरू ठेऊ नये असे आवाहन नपाच्या मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे.
कोरोनाच्या काळात दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ हीच वेळ व्यवसायासाठी योग्य - प्रशासनाने पुनर्विचार करावा - व्यापा-यांची मागणी
         आता दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. खरे म्हणजे ही वेळ सायंकाळी ५ वाजेपर्यंतच राहीली असती तरी चालले असते असे मत व्यापारी बांधवांनी व्यक्त केले आहे.याच बाबतची चर्चा व्यापारी बांधवात जोर धरत आहे. बॅंकेचे व्यवहार दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू असतात. तर शहरी व ग्रामीण भागातील ग्राहक दुपारीच खरेदी आटोपून घेत असतो. सायंकाळी ग्राहकांची वर्दळ बाजारपेठेत नसते अशीच स्थिती आहे. केवळ फिरणारे या वेळेचा फायदा घेऊन गावात फिरत असल्याचे दिसून येत आहे. तरी दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळेबाबतच्या निर्णयाचा प्रशासनाने पुनर्विचार करावा अशी मागणीही व्यापारी बांधवांनी काही अधिकारी व लोकप्रतिनिधींकडे केली असल्याचे समजते.आता याबाबतचा निर्णय प्रशासनावर अवलंबून असून या विषयाकडे प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न  निर्माण होत आहे. 
        तसेच निर्धारित वेळेनंतरही काही दुकानदार आपली दुकाने सुरू ठेवत असल्याचे दिसून येत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या सुचनांचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे.तरी अशा दुकानदारांना योग्य ती समज दिली पाहिजे आणि वारंवार नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाई करावी अशीही मागणी जनतेतून करण्यात येत आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines