अमळनेर - कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव व मोहरम सण कशा रीतीने साजरा करावा शासनाने निश्चित केलेल्या नियमांची माहिती देण्यासाठी आज अमळनेर येथे पोलीस विभागाच्या वतीने बैठक घेण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा व अमळनेर सौरभ अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी श्री अग्रवाल यांनी सांगितले की, सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीची मर्यादा ४ फूट तसेच घरगुती गणेशोत्सवाच्या मूर्तीची मर्यादा २ फूट असावी. कलम १४४ लागू असल्याने गर्दी करू नये. सजावट तसेच ध्वनिप्रदूषण होऊ नये.तसेच गणेश मंडळांना दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे नियमभंग झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल. विशेष करून शिक्षण घेणाऱ्या १४ ते २५ या वयोगटातील विद्यार्थ्यांनी हुल्लडबाजी करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. असे केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. गणेश मूर्तीच्या आगमनाची तसेच विसर्जनाची मिरवणूक काढू नये. गणेश मंडळांनी खर्चात कपात करून शिल्लक राहिलेला निधी कोविड १९ या साथ आजार निवारणासाठी उपयोगात आणावा. याबाबत मंडळांनी विचार करावा असे आवाहन त्यांनी केले.

या आवाहनास मंगलमूर्ती पतपेढी गणेशोत्सव मंडळाने प्रतिसाद देत कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचा एक दिवसाचा जेवणाचा खर्च करण्यात येईल असे मंडळाचे अध्यक्ष बापु वाणी यांनी सांगितले. या बैठकीस पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, पोलीस कर्मचारी, शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार आदी उपस्थित होते.
No comments
Post a Comment