अमळनेरातील गुटखा किंग एलसीबीच्या जाळ्यात, स्थानिक गुन्हे शाखेच्या छाप्यात ५ लाख १५ हजार रूपयांचा गुटखा जप्त पोलीसात गुन्हा दाखल,आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी जीवघेण्या गुटख्याची खुलेआम विक्री थांबणार की नाही ?

Sunday, October 11, 2020

/ by Amalner Headlines
अमळनेर -
  येथील चोपडा रोड, शनिपेठ भागात एका घरात काल रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात ५ लाख १५ हजार १२० रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  
मुद्देमाल जप्त
       शनिपेठ भागातील गोकुळ जगन्नाथ पाटील, (रा.मंगळ नगर) यांच्या घरात स्था.गु.शाखेच्या पथकाने छापा टाकला असता विमल गुटखा २ पोते, सागर १० पोते,मिराज ४ बॉक्स असा एकूण ५ लाख १५ हजार १२० रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 
कोणी केली कारवाई
                  ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण पाटील,पो.हे.कॉ.रामचंद्र बोरसे,सुनील दामोदरे,पो.ना. मनोज दुसाने,पो.कॉ. दिपक शिंदे, परेश महाजन, चालक  प्रविण हिवराळे यांच्या पथकाने केली. सदर प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि.नं.५८४/२०२०,भादंवि कलम २७२,२७३,३२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई करीता आरोपीस अमळनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कारवाईने खळबळ पण विक्री थांबणार कधी ?
       या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पण या जीवघेण्या गुटख्याची सहजपणे होणारी खरेदी - विक्री थांबण्याची आवश्यकता आहे. बाजारात खुलेआमपणे गुटख्याची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.ही खरेदी - विक्री थांबणार की नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे. कॅन्सर सारख्या आजारास गुटखा सेवन कारणीभूत असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे.तरीही गुटखा व्यापार तेजीत असल्याचे दिसून येत आहे.संबंधित विभागांनी याबाबत कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा जनमानसातून व्यक्त होत आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines