अमळनेर - आता देशात अनलॉक ५ ची प्रक्रीया सुरू झाली आहे. त्या अंतर्गत काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी शासनाच्या निर्देशांनुसार नवीन नियमावली जाहीर केली आहे. अमळनेर शहरातील दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. तर दर सोमवारी असणारा जनता कर्फ्यु यापुढे असणार नाही असे जाहीर करण्यात आले आहे.
काय आहेत निर्देश
आगामी काळात असलेले नवरात्र,दसरा,दिवाळी उत्सव आणि सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत
असल्याने शासकीय निर्देशानुसार नियम शिथिल करण्यात आले आहे. शहरात दर सोमवारी पाळण्यात येत असलेला जनता कर्फ्यु रद्द करण्यात आला आहे. तसेच मार्केट मधील दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुकाने सुरू ठेवण्याची वेळ वाढविण्यात यावी अशी मागणी काही दिवसापूर्वीच येथील छ.शिवाजी महाराज मार्केट असोसिएशनने प्रशासनाकडे केली होती. आता ही मागणी मान्य झाली आहे.मात्र हे करताना व्यापारी व नागरिकांनी मास्क वापरणे आणि सोशल डिस्टसिंग पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अमळनेर तालुक्यात मागील ७ - ८ महिन्यापासून कोरोना आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता.हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने निर्बंध लावण्यात आले होते.
त्यात दुकाने उघडण्याबाबत निर्धारित वेळेची मर्यादा,उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षात व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनुसार दर सोमवारी जनता कर्फ्यु लागु करण्यात आला होता. आता शासनाने या नियमांत शिथिलता दिल्याने व्यापारी वर्गात उत्साह निर्माण झाला आहे.
No comments
Post a Comment