केळी पिक विम्याची नुकसान भरपाई तातडीने द्या - खा. उन्मेश पाटील यांची कृषी आयुक्तांकडे मागणी

Tuesday, October 6, 2020

/ by Amalner Headlines
चाळीसगाव -
हवामानावर आधारित फळपीक विमा योजना सन २०१९-२० मध्ये जळगाव जिल्ह्यातील केळी पिक विमा घेतलेल्या शेतक-यांना त्यांची विमा रक्कम तातडीने मिळावी अशी मागणी खासदार उन्मेष दादा पाटील यांनी केली आहे.
          कृषी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात खा. पाटील यांनी म्हटले आहे की,जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या अंदाजित ४२,१७९ इतकी आहे. त्यांचे ५४,१२४ हेक्टर क्षेत्र संरक्षित केलेले असून विमा हप्त्याच्या शेतकरी हिश्‍श्‍याची रक्कम अंदाजीत ३४ कोटी २९ लक्ष भरलेली असताना शासन निर्णयानुसार लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम विमा कालावधी संपुष्टात आल्यानंतर ४५ दिवसात किंवा महाराष्ट्र शासनाने त्यांच्या हिश्याची विमा हप्ता रक्कम दिल्याच्या ३ आठवड्यांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक असल्याचे नमूद केले असतांना अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नसून तातडीने नुकसान भरपाई मिळवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी कृषी आयुक्तांकडे केली आहे. याबाबत दिलेल्या पत्रात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी विमा कालावधी दिनांक ३१ जुलै २०२० रोजी पूर्ण झालेला असून आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांच्या खात्यात सदरील रक्कम जमा झालेली नाही. तसेच महाराष्ट्र शासनाने ३ ऑगस्ट २०२० च्या शासन निर्णयानुसार राज्याच्या हिश्याची विमा रक्कम जमा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केलेला असून प्रत्यक्षात माहिती घेतली असता सदरील रक्कम संबंधित विमा कंपनीच्या खात्यात दिनांक १० सप्टेंबर २०२९ रोजी जमा झाली असल्याचे समजते. वरील प्रमाणे विमा कालावधी संपून ४५ दिवस तसेच राज्य शासनाने विमा हिश्याची रक्कम भरून ३ आठवडे पूर्ण झाले असून आजतागायत शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.  संदर्भीय शासन निर्णयात विमा कंपनीच्या भूमिका व जबाबदाऱ्या मधील मुद्दा क्रमांक २१ अन्वये कंपनीने विमा रक्कम देण्यास केलेल्या विलंबामुळे सर्व शेतकऱ्यांना १२ टक्के दराने विलंब शुल्कासहित नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ मिळावी ही आग्रही मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines