अमळनेर - तालुक्यासह शेजारील परिसराची जल संजीवनी ठरणा-या पाडळसरे धरणाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकप्रतिनिधी व धरण जनआंदोलन समितीच्या एकत्रित दबावामुळे मार्ग निघेल असा आशावाद खा.उन्मेष पाटील यांनी पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केला. जनआंदोलन समितीतर्फे सहा तालुक्यातीलआमदारजिल्ह्यातील मंत्री,व खासदार यांना नुकतेच पत्र देऊन धरणाच्या कामाबद्दल दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर खा.उन्मेष पाटिल यांनी जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तर आ.अनिल पाटिल यांचीही समितीने नुकतीच भेट घेतली होती.

समितीने व्यक्त केल्या अपेक्षा
पाडळसरे धरणाचे काम बंद पडू नये,राज्य शासनातर्फे किंवा केंद्र सरकारतर्फे सदर धरणास मुबलक निधी उपलब्ध व्हावा या करिता जनआंदोलन समिती सातत्याने प्रयत्न करीत आहे. खा.उन्मेष पाटिल यांनी जनआंदोलन समितीच्या कार्यालयात समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी समितीचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी पाडळसरे प्रकल्प केंद्र सरकारच्या योजनांमध्ये समाविष्ट करून घ्यावा व एक रकमी निधी द्यावा यासाठी खासदारांनी विशेष प्रयत्न करावे असे आवाहन केले.समितीचे पदाधिकारी अजयसिंग पाटिल, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,सुनिल पाटिल,महेश पाटिल यांनी धरणाच्या केंद्रीय योजनेत समावेशाबाबत खासदारांकडून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

खासदारांचा सकारात्मक प्रतिसाद
याप्रसंगी चर्चेस उत्तर देतांना खा.पाटील यांनी पाडळसरे धरण प्रकल्प राज्य शासनाच्या शिफारशीने पंतप्रधान कृषी संजीवनी योजनेत समाविष्ट करण्यासाठी वेळोवेळी जलशक्ती मंत्र्यांची भेट घेतली असून या धरणाबाबत आग्रही असल्याचे सांगितले तर राजकारणापलीकडे जाऊन स्थानिक सर्व आजी माजी लोकप्रतिनिधीं आणि जनआंदोलन समितीसह दबाव निर्माण करून राज्य व केंद्र सरकारच्या कोणत्याही योजनेत सदर धरण समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करू यासाठी राज्याचे मुख्यमंत्री यांचीही भेट घेणार असल्याचे सांगत केंद्र व राज्य शासनाशी केलेला पत्रव्यवहार व प्रतिसाद समिती समोर मांडला.याप्रसंगी पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार,चाळीसगावचे उपसभापती भाऊसाहेब पाटिल उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी धरण जनआंदोलन समितीचे पदाधिकारी हेमंत भांडारकर, प्रशांत भदाणे, सुनिल पवार,आर.बी.पाटिल, रियाजुद्दीन मौलाना, ऍड रज्जाक शेख, निवृत्त स्टेशन मास्टर डी.के. पाटिल,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गोकुळ पाटील,प्रभाकर पाटील,शराफत मिस्त्री,कमाल मिस्त्री,अखतर अली,खालिद आदिंसह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.बैठकीचे सूत्रसंचालन व आभार रणजित शिंदे यांनी मानले.
आ.अनिल पाटिल यांच्याशीही समितीच्या सदस्यांची चर्चा
समितीच्या सदस्यांची मंत्रालयात लवकरच बैठक घेण्याचा प्रयत्न
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर थांबलेली विकास कामे आणि राज्यातील इतर प्रकल्पांना मिळणारा निधी लक्षात घेऊन समितीने धरणाच्या संभाव्य लाभार्थी मतदार संघातील लोकप्रतिनिधींना प्रकल्पपूर्तीच्या आश्वासनांची आठवण नुकतीच लेखी पत्र देऊन करून दिलेली आहे.आ.अनिल पाटील यांच्याशीही धरणाच्या कामाबाबत सुभाष चौधरी,सेवानिवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील,सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,देविदास देसले यांनी चर्चा केली.धरणाच्या कामांबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर झालेल्या आहेत. निधी मिळण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार केला जात आहे.लवकरच पाडळसरे धरणाबाबत जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांसह मंत्रालयात बैठक लावणार असल्याचे आश्वासन आ.अनिल पाटील यांनी दिले आहे.
धरणाच्या पूर्णत्वासाठी पुन्हा आंदोलन करावे का ? - समितीचा सवाल
धरण पूर्तीसाठी रस्त्यावर उतरून पुन्हा जनआंदोलन करावे लागेल का? असा सवाल समितीतर्फे सर्व लोकप्रतिनिधींना देण्यात आलेल्या पत्रातून विचारण्यात आलेला आहे.
No comments
Post a Comment