---------------------------------------------------------------------
मुंबई - विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेऊन दिवाळीनंतर राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. या नंतर राज्यभरात शाळा सुरु करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. राज्य सरकारकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली होती. मात्र, दिवाळीनंतर पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढताना दिसत असून रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तसेच येत्या दोन महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपेंसह स्थानिक प्रशासनाने अधिक काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. त्यामुळे वाढत्या धोक्यात शाळा सुरु होणार का असा प्रश्न पुन्हा निर्माण झाल्याने संभ्रम वाढत आहे.
स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय - शिक्षण मंत्री
शाळा सुरु करत असतांना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरु कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरु करत असतांना स्थानिक जिल्हा अधिकारी, गटविकास अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करावा. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत.
शाळा सुरु होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रत्यक्ष वर्ग सुरु झाले तरी ऑनलाईन शिक्षण पद्धती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी आणि शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
राज्यातील शाळांसाठी कडक नियम
शाळा सुरु करतांना खबरदारी म्हणून विद्यार्थ्यांना काही नियम पाळावे लागणार आहेत. त्यात एका विद्यार्थ्यांला एका बेंचवर बसविण्यात येईल, एक दिवसाआड वर्ग भरतील, विद्यार्थ्यांनी घरून जेवण करून यावे, स्वत:ची पाण्याची बाटली सोबत आणावी. चार तासांची शाळा राहील त्यात केवळ विज्ञान, गणित आणि इंग्रजी असे कठीण विषय शिकवले जातील. या विषयांसह बाकी विषयांसाठी ऑनलाईन वर्गांची सुविधा असेल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
No comments
Post a Comment