=======================================
-----------------------------------------------------------------
अमळनेर - क्रूर केंद्र सरकारने शेतकऱ्यांविरोधात आडमुठे धोरण स्वीकारल्याने या विरोधात उद्या मंगळवार दि. ८ डिसेंबर रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. तरी देशाचे केंद्रबिंदू असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी अमळनेर शहर व तालुका आणि मतदारसंघातील सर्व व्यापारी बांधव, खाजगी आस्थापना व तमाम जनतेने या बंदमध्ये सहभागी होऊन बंद यशस्वी करावा असे विनम्र आवाहन महाविकास आघाडीतर्फे आमदार अनिल भाईदास पाटील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, प्रहार संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, आर.पी.आय (कवाडे गट), राष्ट्रीय किसान मोर्चा व इतर घटक पक्षांनी केले आहे. सदर बंदच्या पार्श्वभूमीवर उद्या सकाळी ९:३०वाजता विजय मारुती मंदिर येथून महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि विविध संघटनांतर्फे भव्य रॅली काढून व्यापारी बांधवाना बंदचे विनम्र आवाहन करण्यात येणार आहे. तरी यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी बांधव, व्यापारी बांधव आणि नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाविकास आघाडीतर्फ़े आ.अनिल पाटील यांनी केले आहे.
दरम्यान केंद्र सरकारने शेतकरी-शेतमजूर विरोधात तीन काळे कायदे पारीत केले आहेत. ते कायदे रद्द करण्यासाठी देशात सर्वच ठिकाणी आंदोलने केली गेली. परंतु गेल्या ८ ते १० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर भारतातील सर्व शेतकरी संघटना तसेच हरीयाणा, पंजाब, बिहार, इ. राज्यातील शेतकरी बांधव, कायदे रद्द करण्यासाठी गेल्या रस्त्यावर उतरले आहेत. अशावेळी अमानुष केंद्र सरकार शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रूधूर, थंड पाण्याचा मारा, अशा क्रूर कृती करीत आहे. याचा निषेध व आंदोलनास पाठिंबा म्हणून विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी उद्या दि. ८ रोजी भारत बंदची घोषणा केली असून, राज्यातील महाविकास आघाडी शासनाने देखील या बंदला जाहीर पाठिंबा दिलेलाच आहे. अमळनेर तालुका व परिसर शेतकरी बहुलच असल्याने शेतकरी राजा या भूमीचा आत्माच आहे. यासाठी बळीराजास पाठिंबा देणे काळाची गरज आहे. हा अन्नदाता शेतकरी जगला तरच आपण सर्व जगू या भावनेने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला फक्त एक दिवस कडकडीत बंद पाळून मनस्वी पाठींबा द्यावा असे आवाहन आमदार अनिल पाटील व महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.
No comments
Post a Comment