अमळनेर - येथील उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांच्या कार्यालयात प्रशासन व व्यापारी संघटना यांच्यात झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार आठवड्यात एक दिवस दर रविवारी जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार उद्या दि. १३ डिसेंबर रोजी अमळनेर शहरात जनता कर्फ्यु असणार आहे.
त्यानुसार रूग्णालय,मेडिकल स्टोअर्स,कृषी सेवा विषयक दुकाने व दूध विक्री केंद्र वगळता मुख्य बाजारपेठ व अन्य सर्व दुकाने,शॉप्स बंद ठेवण्यात येणार आहेत याची व्यापारी बांधव व नागरिकांनी नोंद घ्यावी.
व्यापारी बांधवाच्या संमिश्र प्रतिक्रिया
प्रशासनाने घेतलेल्या जनता कर्फ्युच्या निर्णयाबाबत व्यापारी बांधवांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मागील काळात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेतला होता.त्या निर्णयाला व्यापारी बांधवांनी पाठींबा दिला होता. त्यामुळे दर सोमवारी स्वयंस्फुर्तीने जनता कर्फ्यु पाळण्यात येत होता. पण आता तडकाफडकी निर्णय घेण्यात आला असल्याची भावना व्यापारी बांधवांमध्ये निर्माण झाली आहे. असा तातडीने निर्णय घेण्यासारखी परिस्थिती आहे का ? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे.
एकच दिवस निश्चित करावा - व्यापा-यांची अपेक्षा
नोकरदार वर्गास आपली घरगुती कामे रविवार किंवा सुटीच्या दिवशी करण्याची उसंत मिळते.याच दिवशी जनता कर्फ्युमुळे जर बाजारपेठ किंवा अन्य दुकाने जर बंद असली तर अशा मंडळींचे नियोजन चुकू शकते. त्यातच आता अमळनेर नपाने दर सोमवारी 'नो व्हेईकल डे' पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे दर रविवार ऐवजी दर सोमवारीच जनता कर्फ्यु व 'नो व्हेईकल डे' असे नियोजन केले तर ते अधिक उपयुक्त ठरू शकते अशीही चर्चा व्यापारी वर्गात आहे. प्रशासनाने घेतलेला जनता कर्फ्युचा निर्णय व्यापारी बांधव नियम म्हणून पाळतीलही पण आर्थिकदृष्ट्या विचार केला तर हा निर्णय संयुक्तिक ठरणार आहे का ? याचाही विचार होणे गरजेचे आहे अशी चर्चा व्यापारी बांधवात आहे.

No comments
Post a Comment