उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निर्देशाने पाडळसरे प्रकल्पासाठी ३५ कोटीचा निधी वितरित धरणासाठी १६ ला मुंबईत महत्वपूर्ण बैठक खा.शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त आ.अनिल पाटील निर्मित दिनदर्शिकेचे प्रकाशन

Friday, December 11, 2020

/ by Amalner Headlines

अमळनेर - 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिमीत्त आमदार अनिल भाईदास पाटील यांनी ८०,०००दिनदर्शिका आपल्या मतदारसंघात वाटप करण्याचे नियोजन केले असून त्याचे प्रकाशन आज दि.११ रोजी मुंबई येथे खा. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
धरणाच्या कामासाठी ३५ कोटी रुपये मंजूर
                  आ.अनिल पाटील व अमळनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असंख्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला, सर्वांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्यानंतर त्यांनी सर्वांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला व मतदारसंघातील स्थिती देखील त्यांनी जाणून घेतली. दरम्यान या सोहळ्यानंतर आ अनिल पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचीही भेट घेऊन कोरोना महामारी आल्यापासून निधी अभावी पाडळसरे धरणाचे काम बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले, यामुळे अजित पवारांनी तात्काळ वित्त विभागास  ३५ कोटी रुपये निधी रिलीज करण्याचे आदेश दिले, एवढेच नव्हे तर येत्या मार्च पर्यंत ६० कोटी निधी पाडळसरे धरणासाठी रिलीज करावेत अश्या स्पष्ट सूचना देखील त्यांनी केल्या. याशिवाय पाडळसरे प्रकल्पाच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मुंबईत अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दि.१६ डिसेंबर रोजी दुपारी ३:३० वाजता बैठक घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागास दिले. सदर बैठकीत आ.अनिल पाटील, प्रकल्प संचालक शिंदे, डिझाइन चीफ इंजिनिअर, तापी महामंडळाचे कार्यकारी अभियंता मुंडे उपस्थित राहणार आहेत.
कापूस व मका खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी
             आ.अनिल पाटील यांनी यावेळी अमळनेर येथे कापूस व मका खरेदी केंद्र सुरू न झाल्याने तातडीने निर्णय घेण्याची विनंती केली. यावर उपमुख्यमंत्री ना. पवार यांनी मार्केटिंग फेडरेशनचे चेअरमन यांना सुचना करून अमळनेर येथे कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. याशिवाय मका खरेदी केंद्र अमळनेरात सोमवारपासून सुरू करण्याचे आदेश दिल्याने आमदारांसह शिष्टमंडळाने अजित पवारांचे विशेष आभार व्यक्त केले. तर आ.अनिल पाटील यांनी तात्काळ अमळनेर तहसीलदारांना भ्रमणध्वनीद्वारे मका खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश होऊन गोडावून देखील उपलब्ध झाले असल्याने सोमवार पासून खरेदी सुरू करावी अश्या सूचना केल्यात.
पाडळसरे साठी केंद्राकडेही पाठपुरावा करण्याची तयारी
            उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांना देखील पाडळसरे धारणाच्या कामास गती देण्याबाबत चर्चा करण्यासाठी बोलावले असून सुरवातीला सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करून वेळ पडल्यास केंद्राकडून पैसा उपलब्ध करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याची तयारी आपण ठेऊ असे संकेत त्यांनी आमदारांसह शिष्टमंडळाला दिले.
       यावेळी शिष्टमंडळात जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.तिलोत्तमा पाटील, प्रा.अशोक पवार, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, प्रा. सुरेश पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, पं.स.सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती बागुल, विनोद जाधव, एस.टी.कामगार संघटनेचे एल.टी.पाटील, कृ.उ.बा.संचालक विजय पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष विनोद पाटील, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष निलेश देशमुख, हिंमत पाटील, गौरव पाटील, श्रीनाथ पाटील, योगेश भागवत, हिरालाल भिल, मुशीर शेख, शेखर पाटील, गजानन सुर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines