शहरातील दोन्ही खराब रस्ते वाहतुकयोग्य करण्यासाठी आमदारांचा ठेकेदारास २० डिसेंबरचा अल्टीमेटम बांधकाम विभागाच्या तातडीच्या बैठकीत कामास विलंबाबाबत आ.अनिल पाटलांची नाराजी

Sunday, December 6, 2020

/ by Amalner Headlines
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
- * जाहीरात * -
-------------------------------------------------------------------
अमळनेर -
शहरातून जाणा-या धुळे - चोपडा रस्त्याचे काम अंत्यत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून वापरात असलेल्या शहरातील दुस-या रस्त्याचीही वाट लागत असल्याने आ.अनिल भाईदास पाटील यांनी धुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेऊन दगडी दरवाजा समोरील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी आणि शहरातील पर्यायी रस्त्याची डागडुजी करण्यासाठी २० डिसेंबर पर्यंतचा अल्टीमेटम ठेकेदारास दिला आहे. यामुळे ठेकेदाराने गांभीर्याने घेऊन कामाचा वेग वाढविला आहे.
         हायब्रीड अम्युनिटी अंतर्गत  धुळे - चोपडा या प्रमुख रस्त्याचे काम होत असून प्रामुख्याने दगडी दरवाजा ते आर.के.नगर पर्यंतचे काम अनेक महिन्यांपासून अतिशय संथगतीने सुरू असल्याने शहर वासीयांची मोठी गैरसोय झाली आहे, याशिवाय हे काम सुरू असतांनाच दगडी दरवाजाचा बुरुज कोसळल्याने धोका नको म्हणून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. यामुळे पर्यायी रस्ता म्हणून गांधलीपुरा मार्गाचा वापर सुरू झाला.
परंतु येथून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने सुभाष चौक, स्टेशन रोड, कचेरी रोड आदी रस्त्यांची अत्यंत वाट लागली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. तसेच दररोज होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक अक्षरशः वैतागून धुळे रस्ता कधी सुरू होतोय याची वाट पाहत आहेत. सुदैवाने दगडी दरवाजाचा प्रश्न आ.अनिल पाटील व माजी आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या समन्वयाने सुटून पालिकेकडे ते हस्तांतरीत झाल्याने नूतनीकरणासाठी पालिकेने निधी मंजूर केला असून या ठिकाणी असलेले बुरुज नुकतेच पाडण्यात आले आहेत. आता केवळ सुशोभिकरणाचे काम तेवढे बाकी आहे. त्यामुळे दरवाजा समोरील राहिलेले रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा असा आग्रह आ. अनिल पाटील यांनी धरला होता. परंतु तरी देखील ठेकेदाराकडून कामाबाबत विलंब होत असल्याने आ.पाटील यांनी तातडीने धुळे बांधकाम कार्यालय गाठून अधिकारी व ठेकेदारासोबत तातडीची बैठक घेतली.
सदर बैठकीत आमदारांनी जनतेचा संयम आता संपला असून वाहतुकीच्या कोंडीमुळे होत असलेला दररोजचा त्रास आता असह्य होत आहे. यामुळे आता कोणतीही सबब चालणार नसून कोणत्याही परिस्थितीत येत्या २० डिसेंबर पर्यंत धुळे रस्त्याचे दगडी दरवाजासह संपूर्ण काम वेगाने पूर्णत्वास आणून हा रस्ता वाहतुकीसाठी खुलाच झाला पाहिजे. याशिवाय अवजड व जादा वाहतुकीमुळे शहरातील रस्त्याची जी वाट लागली त्याचीही डागडुजी २० डिसेंबर पर्यंतच करून हा रस्ताही वाहतुकयोग्य झाला पाहीजे अश्या स्पष्ट सूचना आ.पाटील यांनी दिल्याने ठेकेदाराने ही अट मान्य करीत जोमाने ते कामाला लागले आहेत.
आमदारांनी केली दगडी दरवाजा समोरील कामाची पाहणी
              आ.अनिल पाटील यांनी दगडी दरवाजा समोर वेगाने सुरू असलेल्या रस्ता कामाची स्वतः पाहणी करून कामाबाबत काही सूचना देखील केल्या. तसेच दगडी दरवाजाची देखील त्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, मार्केटचे माजी संचालक अनिल शिसोदे, देविदास देसले, व्यापारी आघाडीचे दिनेश कोठारी, सचिन बेहरे यासह नागरिक उपस्थित होते.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
अमळनेर येथील सुप्रसिद्ध श्री मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष,खा.शि.मंडळाचे शिक्षक प्रतिनिधी,लायन्स क्लबचे अध्यक्ष, अभ्यासू पत्रकार व आमचे मार्गदर्शक श्री डिगंबर महाले सर यांना वाढदिवसाच्या  शुभेच्छा देतांना अमळनेर हेडलाइन्सचे संपादक गुरूनामल बठेजा,उपसंपादक रोहित बठेजा
---------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines