अमळनेर शहर २७ पासून तीन दिवस बंद रहाणार दोन दिवस लॉकडाऊन व एक दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय

Thursday, March 25, 2021

/ by Amalner Headlines
सोमवारी 'नो व्हेईकल डे' सुध्दा पाळण्यात येणार - शासनाचे आदेश
--------------------------------------------------------------------
                        - * जाहीरात * -
-----------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यासह सर्व जिल्ह्यात कोरोना आजाराची रूग्ण संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रशासनाने जिल्हाभर विविध निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार येथील उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी दि.२७ व २८ मार्च २०२१ रोजी अमळनेर शहरात लॉक डाऊन जाहीर केला आहे. तर दर सोमवारी जनता कर्फ्यु व 'नो व्हेईकल डे' पाळण्यात येत असल्याने सोमवार दि.२९ मार्च रोजीही शहर बंद रहाणार आहे. अतिशय कडकडीत बंद पाळण्याचे निर्देश प्रशासनाने जारी केले आहेत.
मागील काही दिवसांपासून अमळनेर तालुक्यात कोविड-१९ च्या रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. शहरातील विविध भागात शासनाच्या वतीने नागरिकांसाठी कोविड तपासणी शिबीर घेण्यात येत असून पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना राबवणे आवश्यक असल्याने अमळनेर शहर हद्दीत निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
अमळनेरच्या इन्सिडंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांनी अमळनेर नपा हद्दीत दिनांक २७ व २८ मार्च २०२१ असे दोन दिवस लॉकडाऊन लागू केला आहे.
तर सोमवार दि.२९ मार्च रोजी आधीच जाहीर केल्याप्रमाणे जनता कर्फ्यु व 'नो व्हेईकल डे' पाळण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी प्रशासनाने जारी केलेल्या नियमांचे कसोशीने पालन करावे असे आवाहन अमळनेर प्रशासनाने केले आहे.
हे असतील नियम
या कालावधीत शहरातील सर्व बाजारपेठ,आठवडे बाजार बंद राहतील, दुध विक्री दुकाने,दवाखाना,रुग्णालये व मेडिकल दुकाने आदी जीवनाश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद राहतील,आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विभाग व तेथील कर्मचारी यांना परवानगी असेल, किरकोळ भाजीपाला खरेदी विक्री केंद्र बंद राहतील,शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, खाजगी कार्यालये बंद राहतील खाद्यपदार्थांची दुकाने बंद राहतील पण होम डिलीवरी,पार्सल सेवा देणा-या हॉटेल्सचे किचन सुरू राहतील, जाहीर सभा,मेळावे ,धार्मिक स्थळे, सांस्कृतीक,धार्मिक व तत्सम कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही, शॉपींग मॉल्स, मार्केट, कटिंग शॉप, स्पा,सलून बियर बार,लिकर शॉप्स बंद राहतील, गार्डन,पार्क,बगीचे, सिनेमागृहे,नाटयगृहे,व्यायमाशाळा,जलतरण तलाव, प्रदर्शने,मेळावे,संमेलने बंद राहतील,पानटपरी,हातगाड्या, उघड्या वरील खाद्यपदार्थ विक्री बंद असतील असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
कायदेशीर कारवाईचे निर्देश
अमळनेर नगरपालिका हदीत वरील प्रमाणे लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन न केल्यास पोलीस विभाग व नगर परिषद प्रशासनामार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिक,व्यापारी व व्यावसायिक यांनी सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता १८६० (४५) चे कलम १८, आपती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० व फोजदारी प्रक्रिया संहिता १९७६ नुसार शिक्षेस पात्र राहील असे निर्देश देण्यात आले आहेत.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines