इंदिरा भुवनमधील अतिरिक्त कोविड सेंटर रुग्णांसाठी सुरू आमदारांनी केली पाहणी, दात्यांचे मानले आभार

Friday, March 26, 2021

/ by Amalner Headlines
निडरपणे कोविड सेंटरमध्ये जाऊन केली रुग्णांशी चर्चा
-------------------------------------------------------------------
                   - * जाहीरात * -
                    -----------------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लोकसहभागातून येथील इंदिरा भुवनमध्ये ऑक्सिजन बेडची सोय असलेले अतिरिक्त कोविड हेल्थ सेंटर परिपुर्ण झाले आहे. काल आमदार अनिल पाटील यांनी पाहणी केल्यानंतर हे कोविड सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले.
यावेळी सदर सेंटर निर्माण करण्यासाठी आर्थिक योगदान देणाऱ्या मान्यवरांचे जाहीर आभार आमदारांनी व्यक्त केले.
विशेष म्हणजे आमदारांनी कोणतीही भीती मनात न बाळगता अतिशय निडरपणे कोविड सेंटरमध्ये जाऊन रूग्णांची भेट घेत अंतर राखून चर्चा देखील केली. त्यांच्या समस्या आमदारांनी जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताडे,वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष पाटील,संजय पाटील, मार्केटचे प्रशासक एल.टी. पाटील,समाधान धनगर यांचेसह पत्रकार बांधव व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ.ताडे यांनी सदर कोविड सेंटरमध्ये ३० ऑक्सिजन बेड असून २५ बेड विना ऑक्सिजन म्हणजे सामान्य रुग्णांसाठी आहेत, तर ग्रामीण रुग्णालयात ३० ऑक्सिजन बेड आणि इतर सामान्य बेड आहेत आता ५० च्या वर ऑक्सिजन बेड उपलब्ध झाल्याने गंभीर रुग्णांची मोठी सोय झाली आहे. तसेच विना कोविड रुग्णांची सोय सुजान मंगल कार्यालयात असून त्याठिकाणीच आता लसीकरण केले जाणार आहे.
यावेळी आमदारांनी या ठिकाणी अजून काय आवश्यक साहित्य अपेक्षित आहे ते जाणून घेत आमदार निधीतून त्याची पूर्तता करण्यासाठी पत्र देण्याची तयारी दर्शविली. दरम्यान सदर कोविड सेंटरमध्ये प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी प्रशासनाच्या माध्यमातून बेड उपलब्ध केले असून माजी आ.कृषिभूषण पाटील यांनी ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले आहेत, रोटरी क्लबने ऑक्सिजन पाईपलाईन व साहित्य तर श्री डिंगबर महाले व मंगळ ग्रह मंदिर संस्थेने भरीव मदत दिली आहे. या व्यतिरिक्त अजून काही मान्यवर मदत देत असल्याने या सर्वांचे आमदार अनिल पाटील यांनी जनतेच्या वतीने विशेष आभार मानले आहेत.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines