------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणचे आठवडे बाजार बंद ठेवण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार दर सोमवारी अमळनेर शहरात जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे माझी वसुंधरा या अभियानाचा भाग म्हणून आठवड्यात एक दिवस नो व्हेईकल डे पाळण्यात यावा असे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार उद्या दि. ८ मार्च रोजी अमळनेर शहरात जनता कर्फ्यु व नो व्हेईकल डे पाळण्यात येणार आहे. व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवून सहभागी व्हावे.तसेच नो व्हेईकल डे चे पालन करणे नागरिकांना सोयीचे ठरणार आहे. सर्व व्यापारी व व्यावसायिक बांधवांनी प्रशासनाचे नियम पाळून सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.
यांना असेल सवलत
दरम्यान दर सोमवारी पाळण्यात येणार असलेल्या जनता कर्फ्यु मधून रूग्णालय,दवाखाना, मेडिकल दुकाने,कृषी संबधित दुकाने,दूध विक्रेते आदींना वगळण्यात आले आहे. सदर दुकाने सुरू ठेवता येतील असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
दररोज रात्री नाईट कर्फ्यु
अमळनेर शहरात दररोज रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु पाळण्यात यावा असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी जारी केले आहेत. या नाईट कर्फ्युचे नागरिकांनी पालन करावे. अतिशय महत्वाचे काम असल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. नोकरीसाठी बाहेर जाणा-या नागरिकांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवावे. रात्री उशिरा बाहेरगावाहून येणा-या नागरिकांना घरी जाण्यासाठी रिक्षाचा वापर करता येईल.मात्र एका रिक्षात फक्त दोन प्रवाशांना परवानगी असेल. या नाईट कर्फ्युच्या कालावधीत विनाकारण फिरतांना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात म्हटले असून नागरिकांनी या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
No comments
Post a Comment