-------------------------------------------------------------------------
जळगाव - जिल्ह्यासह शहरातही कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी शुक्रवार, शनिवार व रविवार अशा तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या तीन दिवसात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठ बंद रहाणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील जनतेने जनता कर्फ्यूचे पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व प्रशासनाने केले आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोना आजाराच्या रूग्णांची संख्या वाढीस लागली आहे. यामुळे जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. तरीही कोरोना रूग्णांची संख्या लक्षात घेता पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवशी जळगाव शहरात जनता कर्फ्यू लागू करण्याचे निर्देश दिले.त्यानुसार जळगाव शहरात आता तीन दिवसांचा जनता कर्फ्यू असणार आहे. आज पत्रकार परिषदेत जिल्हाधिका-यांनी याची घोषणा केली.
जळगाव शहराच्या हद्दीत दि. ११ मार्च रोजी रात्री आठ वाजेपासून जनता कर्फ्यू सुरू होणार असून तो दि. १५ मार्च २०२१ रोजी सकाळी आठ वाजता संपणार आहे. या दरम्यान,आपत्कालीन सेवा वगळता अन्य सेवा बंद राहणार आहेत. या जनता कर्फ्यूसाठी व्यापारी व जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी केले. या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी डॉ. राऊत यांच्यासह पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, आयुक्त सतीश कुलकर्णी, शल्य चिकित्सक डॉ. एन. एस.चव्हाण यांची उपस्थिती होती.
बंदमध्ये यांचा समावेश
जनता कर्फ्यूमध्ये जळगाव शहरातील सर्व शाळा, कॉलेज आदी शैक्षणिक संस्था, बाजार, भाजीपाला दुकाने, सलून, सर्व खासगी कार्यालये,धार्मिक स्थळे, सार्वजनिक कार्यक्रम, किराणा दुकाने, नॉन-इसेन्शीयल या प्रकारातील सर्व दुकाने, दारू दुकाने, बगीचा, पानटपरी, हातगाड्या, सिनेमागृहे, व्यायामशाळा/जीम, तरणतलाव आदी सर्व बाबी बंद राहणार आहेत.
यांना सुरू ठेवण्यास असेल परवानगी
जनता कर्फ्यूमध्ये वैद्यकीय आपत्कालीन सेवा, जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक, बस, रेल्वे व विमानसेवा; नियोजीत परीक्षा असणारी शाळा व कॉलेजेस, बँका व वित्तीय संस्था, कृषी केंद्र, गॅरेज, वर्कशॉप्स, कुरीयर, सर्व प्रकारची माल वाहतूक, कोविड लसीकरण, अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. तर शासकीय कार्यालयांमध्ये निम्मे उपस्थिती असावी असे या निर्देशांमध्ये सूचित करण्यात आले आहे. ज्यांना जनता कर्फ्यूमधून सुट दिलेली आहे त्यांनी आपापल्या आस्थापना वा सेवांची ओळखपत्रे सोबत बाळगावीत असेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे.

सर्वांनी सहकार्य करावे - पालकमंत्री ना.पाटील
कोरोनाची साखळी तोडायची असेल तर जनता कर्फ्यूसारखे निर्बंध आपल्याला लावावे लागतील. याचमुळे आपण जिल्हाधिकार्यांना निर्देश देऊन जळगावसाठी तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. जनतेसह व्यापार्यांनी याला सहकार्य करण्याचे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले आहे.
-----------------------------------------------------------------------
No comments
Post a Comment