कोरोना प्रतिबंधासाठी शनिवार - रविवार वीकेंड लॉकडाऊन प्रशासनाशी चर्चेनंतर सोमवारचा जनता कर्फ्यु अखेर रद्द

Friday, April 9, 2021

/ by Amalner Headlines
मा.आ.स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वात व्यापाऱ्यांनी घेतली उपविभागीय अधिकारी यांची भेट
-----------------------------------------------------------------------------
अतिघाई करून म्हणणे लक्षात न घेता दंडात्मक कारवाई करणा-यांना आवर घाला - मागणी
----------------------------------------------------------------------------------
- * जाहीरात * -
--------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोनाआजाराच्या वाढत्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी प्रशासनाने दर सोमवारी जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत व्यापारी आणि प्रशासन यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. पण मागील काही दिवसात राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याने महाराष्ट्र शासनाने काही निर्बंधासह मिनी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय दि.५ एप्रिल रोजी घेतला आहे. त्यामुळे सलग तीन दिवस दुकाने बंद ठेवावी लागत होती. या निर्णयास व्यापारी बांधवांनी विरोध करत आपली भुमिका मांडण्यासाठी मा.आ.स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वात आज उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत दर सोमवारी असलेला जनता कर्फ्यु रद्द करण्यात आला आहे. या चर्चेदरम्यान व्यापा-यांनी आपल्या विविध समस्या देखील मांडल्या. यावेळी तहसिलदार मिलिंद वाघ भाजपाच्या सौ.भैरवी वाघ - पलांडे, व्यापारी संघटनेचे रमेश जीवनानी,बापू हिंदुजा,कमल कोचर प्रकाश जग्यानी हे उपस्थित होते.
मिनी लॉकडाऊनला विरोध
शासनाने नवीन नियम जाहीर करून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दररोज निर्धारित वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे तर अत्यावश्यक सेवेत न मोडणारी दुकाने दि.५ एप्रिल पासून ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मिनी लॉकडाऊनच्या निर्णयाच्या विरोधात संपूर्ण राज्यात व्यापारी वर्गातून निषेध व्यक्त केला जात आहे. या विषयावर मुख्यमंत्री व व्यापारी प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली असून लवकरच महाराष्ट्र शासन नवीन नियमावली जाहीर करण्याच्या तयारीत आहे.
अमळनेरात व्यापा-यांची बैठक
दरम्यान आज अमळनेर शहरातील अनेक व्यापारी बांधवांनी आपले गाऱ्हाणे माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या कडे मांडले. या संदर्भात निकुंभ हाईट्स येथे बैठक झाल्यानंतर व्यापारी शिष्टमंडळाने स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेत शनिवार व रविवार वीकेंड लॉकडाऊनचे पालन करण्यात यावे. पण नंतर सोमवारी असलेला जनता कर्फ्यु रद्द करण्यात आला आहे. यावेळी व्यापारी बांधवांनी आपल्या समस्या प्रशासनाकडे मांडल्या.
सुबह श्याम 'राधेश्याम' ची भिती
दिवसभर दुकाने सुरू असतांना व सायंकाळी दुकाने बंद करण्याच्या वेळेस नपाच्या अतिक्रमण पथकाकडून कारवाई करण्याची अतिघाई करण्यात येते. दुकानदारांचे काहीही ऐकून न घेता दंडाची कारवाई करण्यात येते. याबाबत सर्व व्यापारी बांधवांत नाराजी आहे. सुबह श्याम आम्हाला राधेश्यामची भिती वाटते अशी भावना व्यक्त करण्यात आली. संबंधितांना याबाबत योग्य निर्देश देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली.
स्मिताताईंनी चर्चेत मांडली व्यापा-यांची बाजू
मा.आ.स्मिताताई वाघ यांनीही व्यापारी वर्गास लॉकडाऊनमुळे येत असलेल्या अडचणी चर्चेदरम्यान उपस्थित केल्या. सर्व दुकानांना सुरू करण्यास परवानगी दिली पाहिजे. जी दुकाने उघडण्यास निर्बंध घालण्यात आली आहेत त्या दुकानात येणारे गि-हाईक कमी संख्येत व टप्प्याटप्प्याने येत असतात याचा विचार केला पाहिजे. व्यापारी,व्यावसायिक यांना देखील आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. या सर्वांना दिलासा मिळाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अशा परिस्थितीत व्यवसाय करणा-यांना विनाकारण त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. असे त्रास देणारे जे कुणी असतील त्यांना आवर घाला अशी सुचना त्यांनी केली.
प्रशासनाने दिल्या सुचना
सर्व व्यापारी वर्गाने आपली कोविड टेस्ट करावी, लसीकरण करून घ्यावे,आपल्या दुकानात काम करणारे कर्मचारी यांच्याही चाचण्या करून घ्याव्यात, योग्य ती खबरदारी घ्यावी, नियमांचे पालन करावे,सॅनिटायझर, मास्क,कोविड शिल्डचा उपयोग करावा,फिजिकल सोशल डिस्टनगसिंग ठेवावे,दुकानात गर्दी होऊ देऊ नये आदी सूचना देण्यात आल्या आहेत. मोठ्या संख्येने व्यापारी वर्गाची उपस्थिती होती.
जीवनावश्यक सेवा राहतील सुरू
       दर आठवड्यात शनिवार व रविवार वीकेंड लॉकडाऊन लागू रहाणार आहे. यात शासकीय निर्देशानुसार काही निर्बंध असले तरी किराणा दुकाने,बेकरी,दुध विक्री,भाजीपाला,फळविक्री, रुग्णालय,मेडिकल,कृषी संबंधित दुकाने,बॅंका, सार्वजनिक बस सेवा सुरू ठेवण्यास नवीन सुधारित आदेशानुसार परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय हॉटेल उघडण्यास परवानगी नसली तरी घरपोच पार्सल सुविधा मात्र सुरू ठेवता येईल. अत्यावश्यक सेवा सुरू रहातील की नाही याबाबत संभ्रम असल्याने नागरिकांनी बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती.
------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines