अमळनेर - तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना अन्नसुरक्षा योजनेचा लाभ मिळत नसल्याने लोक संघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर तालुक्यातील लोक संघर्ष मोर्चाचे पदाधिकारी व शेकडो आदिवासी कार्डधारक कुटुंब दि.२६ जानेवारी पासून आमरण उपोषणास बसणार होते. परंतू सदर उपोषणाची बातमी प्रसारीत होताच अमळनेरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी तालुक्यातील आदिवासी रेशनकार्ड ऑनलाईन करून अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्याची विशेष मोहिम चालू केली आहे.
तहसिलदारांचे लेखी आश्वासन
उपोषणाच्या आधीच दिनांक २५ जानेवारी रोजी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी लोक संघर्ष मोर्चाचे पन्नालाल मावळे यांच्यासह मधुकर चव्हाण, गुलाब बोरसे, नितीन पारधी, बालीक पवार, जयेश पारधी, हंसराज मोरे, अविनाश पवार, रावसाहेब पवार, महेंद्र भिल, सुदाम भिल यांच्या सोबत दिवसभरात दोन वेळा चर्चा करून सायंकाळी लोक संघर्ष मोर्चास लेखी पत्र दिले कि, दिनांक २० फेब्रुवारी २०२२ पर्यंत तालुक्यातील सर्व आदिवासी कार्ड धारकांना ऑनलाईन करून अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करून त्या कुटुंबांना मार्च २०२२ पर्यंत रेशन दुकानातून धान्य मिळेल असे तहसिलदारांनी त्यांच्या स्वाक्षरीने लेखी आश्वासन दिल्याने लोक संघर्ष मोर्चाने उपोषण स्थगित केले आहे.
____________________________
No comments
Post a Comment